नागपूर : जुनी मंगळवारी, नवाबपुरा भागातील अरुंद रस्त्यांची नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता. ७) पाहणी केली. मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांनी येथील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आयुक्तांनी मनपा अधिकारी, माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या समवेत परिसरातील रस्त्यांचे निरीक्षण केले.
जुनी मंगळवारी, नवाबपुरा हा फार जुना व दाटीवाटीच्या क्षेत्रातील भाग असून या परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या भागातील विद्यमान रस्ते ९ ते १२ मीटर रुंद करण्यासंबंधी शहराच्या सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ प्रमाणे फेरबदल करण्याचे प्रस्तावित आहे.
मनपा प्रशासनाने ८ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये चंद्रशेखर आझाद चौक ते गंगाबाई घाट, नबाबपुरा मस्जिद ते कमलाबाई वरगणे यांचे घराजवळ गंगाबाई घाट रोड पर्यंत, मिशन स्कूल रोड गंगाबाई घाट रोड ते खोब्रागडे दवाखाना, गोंधळी वाडा रोड ते इटकेलवार वाड्याजवळ, पारशिवनीकर यांच्या घरापासून कोलबास्वामी चौकाकडे जाणारा रास्ता, उमाठे यांचा घरापासून दक्षिणेकडे नागेश्वर प्राथमिक शाळेपर्यंत आणि गंगाबाई घाट छोटी मस्जिद झेंडा चौक पासून आयचीत मंदिर बस स्टॉपपर्यंत या रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे.
मनपा आयुक्तांनी नागरिकांसोबत या रस्त्यांची पाहणी केली. या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी किती जागा लागणार आहे व किती मालमत्ता बाधित होत आहेत व किती निधी आवश्यक आहे, या सर्व बाबींची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले. यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील रस्ते रुंदीकरणासाठी आयुक्तांना निवेदन केले.
याप्रसंगी उपसंचालक नगर रचना विभाग श्री. किरण राऊत, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. गणेश राठोड, श्री. प्रमोद गावंडे, पुरषोत्तम फाळके, विद्युत ढेंगळे, राजेश तेलरांधे, माजी नगरसेवक आणि क्षेत्रातील नागरिक श्रद्धा पाठक, वंदना येंगटवार, योगेश गोन्नाडे, मनोज चाफले, कृष्णा एनप्रेड्डीवार, सुबोध आचार्य, विनोद इंगोले व इतर उपस्थित होते.