मनपा आरोग्य विभागातील परिचारिकांचा प्रातिनिधिक सत्कार
नागपूर : मागील वर्षीपासून देशाला कोरोना नावाच्या महामारीने ग्रासले आहे. या काळात कुटुंबापासून दूर राहून कोरोनाबाधीत रुग्णांची इमानेइतबारे सेवा करणाऱ्या परिचारिकांचे कोरोनाकाळातील योगदान सर्वात मोठे आहे. त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला आपण सलाम करतो, असे गौरवोद्गार महापौर दयाशंकर तिवारी यांनी काढले.
फ्लोरेन्स नाईटिंगेल ह्यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळण्यात येतो. बुधवारी (ता. १२) परिचारिका दिनाच्या निमित्ताने मनपा मुख्यालयातील कोरोना वार रूममध्ये मनपामध्ये कार्यरत परिचारिकांच्या प्रातिनिधिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होती. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य सभापती संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. टिकेश बिसेन यांच्यासह आरोग्य विभागातील विविध केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, परिचारिकांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात विपरीत परिस्थितीत सर्व्हेक्षण केले.
कर्तव्यापासून त्या कधीही दूर गेल्या नाही. कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा केली. रुग्णांनाच त्यांनी आपले कुटुंब समजले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील त्यांचे काम प्रभावी राहिले. आता भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेत त्यांची जबाबदारी अधिक वाढेल. परिचारिकांनी या काळात केलेले कार्य इतरांना प्रेरणा देत राहील, असेही ते म्हणाले.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही परिचारिकांच्या कार्याचा गौरव केला. आजचा सत्कार प्रातिनिधिक आहे. मनपा आरोग्य विभागात कार्यरत प्रत्येक परिचारिकांचा गौरव करण्याची आपली इच्छा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही. रुग्णांच्या संपर्कात येणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका. लसीकरणातसुद्धा त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आणि कार्याला तोड नाही, या शब्दात त्यांनी गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी तर सत्कार समारंभाचे संचालन डॉ. टिकेश बिसेन यांनी केले.
या परिचारिकांचा झाला सत्कार
महापौर व आयुक्तांनी मनपाच्या विविध आरोग्य केंद्रावर कार्यरत परिचारिकांचा सत्कार केला. यामध्ये परिचारिका जयश्री बुधे, नलिनी धकाते, ज्योती मानकर, सरिता तभाने, उज्ज्वला मडके, निता वनवे, वंदना शंभरकर, शालिनी वानखेडे, आकांक्षा रंगारी, सुनंदा भेंडे, सुषमा थूल, अंजली नाहारकर, रहिला हरबडे, दीपावली आटे, रोशनी बारमकर, शीतल रामटेके, सुषमा मारबते, लतिका नारखेडे, शिखा भैसारे, ज्युली शेंडे, उपासना नैताम यांचा समावेश होता.