मनपाच्या वंदे मातरम उद्यानाचे भूमिपूजन
नागपूर: देशाचा इतिहास व सीमा वीर जवानांमुळे सुरक्षित असून सीमेवर लढणारे जवान, स्वतंत्र संग्राम सैनिक यांनी देशासाठी केलेले बलिदान आणि त्याग आम्ही विसरू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
मनपाच्या वंदे मातरम उद्यानाचे आज ना गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला परमवीर चक्र विजेता कॅप्टन योगेंद्र सिंग यादव, महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, आ. प्रवीण दटके, आ. चंद्रशेखर बावनकुळे संजय बालपांडे व अन्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना ना गडकरी म्हणाले या उद्यानांमुळे या भागातील नागरिकांना प्राणवायू मिळेल कारण अत्यंत दाटीवाटीच्या या भागात या उद्यानाची गरज होती. सीमेवर आपले वीर जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढत असतात याचा अनुभव मला आहे. याप्रसंगी ना. गडकरी यांनी जोजिला बोगद्याचे उदाहरण सांगितले.
याच कार्यक्रमात ना गडकरी यांनी महापौर तिवारी यांच्या कामाची स्तुती केली. नवीन नेत्यांमध्ये विकास कामाची कळकळ असली पाहिजे. त्याशिवाय प्रकल्प पूर्णत्वास जाणे कठीण आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाला मोठ्या संखेत नागरिक उपस्थित होते. संजय बालपांडे यांनी आभार मानले. गांधीसागर तलावाजवळ हा कार्यक्रम पार पडला.