नागपूर : देशातील पहिली इलेक्ट्रिक एलिव्हेटेड बससेवा नागपुरात सुरू होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपुरातील रिंगरोडवर पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत ही विशेष बससेवा धावणार आहे.
यासाठी टाटा आणि स्कोडा या प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष बस तयार करण्यात येत असून ही बस 18 मीटर लांबीची असेल. या विशेष बसमध्ये प्रवाशांना विमानाप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
एसटी किंवा महापालिकेच्या डिझेलवर चालवल्या जाणाऱ्या बससेवेपेक्षा या इलेक्ट्रिक बससेवेचे भाडे ३० टक्के कमी असेल, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, देशातील एलिव्हेटेड मार्गावरील इलेक्ट्रिक बस सेवेचा हा पहिलाच प्रयोग असून नागपूरच्या अत्यंत वर्दळीच्या रिंगरोडवर 50 किमी अंतरापर्यंत ही बससेवा राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक शेती पुस्तकाचे प्रकाशन आणि ॲग्रो व्हिजन किसान भवनच्या भूमिपूजनप्रसंगी गडकरी यांनी ही माहिती दिली.
मी देशातील सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांच्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बनवल्या आहेत. अन्नधान्याचे उत्पादन करून कोणताही शेतकरी श्रीमंत होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. जैवइंधन उत्पादक पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात योगदान देऊन शेतकरी समृद्ध होऊ शकतात, असेही ते म्हणाले.