मुंबई: ग्रामीण आदिवासी भागात समाजघटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी टेरी या संस्थेने सुरु केलेले डिजिटल लायब्ररी ऑफ वाईल्ड इडिबल्स हे संकेतस्थळ खूप उपयुक्त आहे असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सचिव जी. एस. गिल यांच्यासह टेरी या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टेरी या संस्थेने पालघर जिल्ह्यातील पाथर्डी या दुर्गम गावातील महिलांना ऊर्जा, पाणी, सकस आहार, अन्नसुरक्षा या मूलभूत घटकांसाठी स्वावलंबी बनवताना परसबागेत रोजच्या आहारात समाविष्ट करावयाच्या फळभाज्या पिकवणे, त्याचा आहारात समावेश करणे, उपलब्ध साधनसामुग्रीमध्ये जेवण जास्त पौष्टिक बनवणे यावर भर दिला होता. हे करताना आदिवासी आणि बालकांची कालांतराने वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
पाथर्डी गावाच्या सफल परिवर्तनाची वाटचाल या संकेतस्थळाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. हवामान बदल आणि अन्न सुरक्षा या दृष्टीकोनातून जंगल आणि त्यासभोवती मिळणारी फळे,वेगवेगळ्या प्रकारचे कंद, बिया यासारख्या गोष्टी पोषणाच्या दृष्टीने मोलाची भूमिका बजावतात. टेरी या संस्थेने अशा प्रकारच्या पोषक पदार्थांची डिजिटल लायब्ररी बनवली आहे. ज्यामध्ये पश्चिम घाटात मिळणाऱ्या २०० प्रजातीच्या वनस्पती, मशरूम याची संपूर्ण माहिती संकलित करून त्यांचे पोषक व औषधी गुणधर्म याची नोंद केली आहे. ही संकलित माहिती विविध क्षेत्रातील अभ्यासकांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून याचे आणखी काही मूल्यवर्धन करता येईल का याचा विचार संस्थेने करावा असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले. ही सर्व माहिती मराठीत उपलब्ध करून देताना गावखेड्यात पोहोचवावी, मूल्यवर्धन करण्याच्या दृष्टीने सीएफटीआरआय अर्थात सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्टिट्यूट या संस्थेची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.