नागपूर: महाराष्ट्रामध्ये थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकाला माझा विरोध असून या विधेयकातील निर्णय लोकशाहीला मारक आहे अशी टिका नगरपरिषद, नगरपंचायत व औदयोगिक नागरी सुधारणा विधेयकावर चर्चा करताना विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विधेयक क्रमांक ६२ वर चर्चा करताना विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी यावर नाराजी व्यक्त करताना सर्वत्र आपली सत्ता कशी येईल असा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचा आरोप केला. एक काळ होता की, लोकं ४०-४० वर्षे सरपंच असायचे. मंडल आयोगाच्या माध्यमातून निर्णय झाला आणि सर्वांना समान संधी मिळू शकली. हे सरकार फक्त मोठया लोकांसाठी आहे असे आरोप होत होते ते आरोप आत्ता खरे वाटू लागले आहेत. हे सरकार फक्त सुट-बुटवाल्यांसाठी निर्णय घेत आहे. या विधेयकात सुधारणा म्हणजे त्याचे उदाहरण असल्याचे अजित पवार म्हणाले.
सरकार असा हट्टीपाणा का करते हेच कळत नाही. सर्वत्र आपलीच सत्ता कशी येईल याच्या प्रयत्नात भाजप असते. सत्ताधारी लोकपण या विधेयकावर नाराज आहेत. गुप्त पध्दतीने मतदान घेतले तर सर्व चित्र स्पष्ट होईल की, कोण विधेयकाच्या समर्थनात आहे आणि कोण विरोधात आहे असा टोलाही सरकारला लगावला.