नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 30 मार्च 2025 रोजीची नागपूर भेट व दरम्यान आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारी संदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज आढावा घेतला.
श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस महामेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन, स्मृती मंदीर रेशीमबाग, दिक्षाभूमी येथील भेट आणि माधव नेत्रालय व सोलार एक्सप्लोसिव कंपनी येथील कार्यक्रमाची संपूर्ण तयारी व यासाठी शासकीय यंत्रणा तथा आयोजक संस्था यांच्या तयारीचा आढावा घेवून श्रीमती बिदरी यांनी यावेळी आवश्यक सूचना दिल्या.