– पिडीतांना शासनाने मदत करावी : ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मागणी
नागपूर : शहरात सोमवारी (३ ऑगस्ट) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना त्याचा फटका बसला आहे. शहरातील प्रभाग २६ अंतर्गत भांडेवाडी डम्पिंग स्टेशन लगतचा परिसर पूर्णपणे जलमय झाला. अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता शासनाने याकडे जातीने लक्ष घालून पिडीतांना मदत करावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा मनपा विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
प्रभाग २६ अंतर्गत भांडेवाडी डम्पिंग स्टेशन लगतच्या सुरज नगर, न्यू सुरज नगर, विश्वशांती नगर, मुरलीनंदन नगर, न्यु पॅंथर नगर, पडोळे नगर झोपडपट्टी, आदर्श नगर, शैलेश नगर, संघर्ष नगर, वैष्णवी नगर, न्यू पवनशक्ती नगर साहील नगर, अंतुजी नगर, अब्बुमिया नगर आदी वस्त्या पूर्णपणे जलमय झाल्या. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जीव मुठीत घेउन त्यांना रात्र काढावी लागली.
अशा स्थितीत वस्त्यांमधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाधित क्षेत्राचा राज्य सरकार आणि जिल्हाधिका-यांनी पंचनामा करून पिडीतांना लवकरात लवकर शासकीय मदत देण्यात यावी, अशीही मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा मनपा विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली.