नागपूर:महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.हिंदू धर्मात गुढी पाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा काढण्यात आली असून नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत केले आहे.
नागपुरात विविध उत्सव मंडळे, सामाजिक संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वागतयात्रा आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पारंपरिक पोशाखांना विशेष मागणी आहे. नऊवारी साड्या, त्यावरील दागिन्यांचा साज, महापुरुषांनी परिधान केलेले कपडे, धोती, कुर्ते, शाल, फेटे असे पारंपरिक कपडे परिधान करून तरुणाई हा सण पारंपरिकरित्या साजरा करत असते.
हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. या गुढीची पूजा केली जाते आणि गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. काही ठिकाणी पुरणपोळी तर काही घरांमध्ये श्रीखंड-पुरीचा बेत करण्यात येतो.