Published On : Mon, Feb 5th, 2018

आदिवासी-ग्रामीण कारागिरांच्या हस्तकलांचे प्रदर्शन काळा घोडा महोत्सवामध्ये राज्य शासनाचा ‘सहभाग’

Advertisement

मुंबई : मुंबई येथील काळा घोडा महोत्सवामध्ये राज्यातील स्वयंसहाय्यता गटांबरोबरच आदिवासी कारागिरांना आपल्या खादी व बांबू हस्तकला सादर करण्याची संधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कारागिरांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील सहभाग या सामाजिक उत्तरदायित्त्व कक्षातर्फे (सीएसआर) राबविण्यात आलेल्या या उपक्रमास देशी-विदेशी पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील विविध उद्योगसमूह, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून मुख्यमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने सहभाग हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि मागासलेल्या समाजघटकांचे जीवनमान उंचावण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आदिवासी व ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांसह खादी आणि बांबूच्या वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत असतात.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई येथे 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2018 यादरम्यान सुरु असणाऱ्या प्रसिद्ध अशा काळा घोडा कला महोत्सव-2018 मध्ये ‘सहभाग’चा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवर महिला आर्थिक विकास महामंडळ, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग मंडळ यांच्यासह आदिवासी कलाकारांनी हस्तकला वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. यामध्ये बांबूंची पर्यावरणपूरक उत्पादने, टसर सिल्क साडी, पेपरमेशच्या नाविन्यपूर्ण वस्तू, वारली कलाकुसर, हाताने विणलेली खादीची उत्पादने यांचा समावेश आहे. या वस्तूंना देशी-विदेशी पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

वैशिष्ट्यपूर्ण ‘कल्पवृक्षा’द्वारे पर्यटनाची माहिती

या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाराष्ट्रातील पर्यटनाच्या संधींची माहिती देणारा 15 फुटी कल्पवृक्ष प्रदर्शित करण्यात आला आहे. अतिशय कल्पकतेने उभारलेल्या या कल्पवृक्षावर महाराष्ट्रातील 5 नैसर्गिक घटकांची देण्यात आलेली माहिती प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करीत आहे. समुद्र किनारे, साहसी स्थळे, खाद्यपदार्थ, प्राचीन-ऐतिहासिक वास्तू, विविध प्रकारची पर्यटनस्थळे आदींची भेट या कल्पवृक्षाच्या माध्यमातून घडत आहे. तसेच या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आकर्षक सेल्फी स्पर्धेद्वारे पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Advertisement
Advertisement