नागपूर :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काँग्रेसने मराठा कार्ड खेळले आहे. काँग्रेस पक्षाने 48 उमेदवारांच्या पहिल्या यादीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. नागपूरच्या या हायप्रोफाईल जागेवर प्रफुल्ल गुडधे (पाटील) देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देणार आहेत. यापूर्वी या जागेवरून केदार जाधव आणि अनिल देशमुख निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र ही जागा काँग्रेसकडे आल्यानंतर महाविकास आघाडीकडून प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी देण्यात आली.
वडील विनोद गुडधे पाटील यांचा एकेकाळी देवेंद्र फडणवीसांना होता पाठींबा-
दक्षिण नागपुरातून विधानसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रफुल्ल गुडधे यांच्या वडिलांचा एकेकाळी देवेंद्र फडणवीसांना पाठींबा होता. प्रफुल्ल गुडधे पाटील यांचे वडील विनोद गुडधे पाटील हे भारतीय राजकारणी आहेत. भाजपचे ताकदवान नेते म्हणून ते ओळखले जायचे. विनोद गुडधे पाटील हे नागपूर जिल्ह्यातील नागपूर पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . ते नारायण राणे यांच्या मंत्रालयात राज्यमंत्री होते. काही काळानंतर त्यांनी भाजपाची साथ सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश केला .
देवेंद्र फडणवीसांसोबत नामांकन अर्ज भारतानाच्या ‘त्या’ फोटोची चर्चा –
देवेंद्र फडणवीस 1989 मध्ये भाजपमध्ये सक्रीय झाले होते. त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पुढे 1990 साली ते नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली. 1992 ला देवेंद्र फडणवीस हे भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष झाले. 1992 ते 2001 या काळात ते नागपूरचे महापौर झाले. यादरम्यानचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस नामांकन अर्ज दाखल करताना दिसत असून त्यांच्या डाव्या बाजूला नितीन गडकरी आणि उजव्या बाजूला विनोद गुडधे पाटील उभे आहेत. मात्र काळानुसार आता राजकीय समीकरण बदलले असून विनोद गुडधे पाटील यांचे पुत्र प्रफुल्ल गुडधे (पाटील) यांच्यात दक्षिण- पश्चिम नागपूरमध्ये काटे की टक्कर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.