पिंपळधरा शिवारातील घटना
दोन आरोपी ना हिंगणा पोलिसांनी केली अटक
टाकळघाट/११ जुलै:-सोबतच गाडी चालविणाऱ्या तीन चालक मित्रांपैकी दोघांनी मिळून किरकोळ वादावरून तिसऱ्याची हत्या केली. ही घटना बुधवार दि १० जुलै च्या मध्यरात्री १२:३० वाजता दरम्यान पिंपळधरा शीवारात घडली. हिंगणा पोलिसांनी काही तासाच्या आतच या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
मृतक पारस रमेश निरंजने (वय २२),रा दहेली जि चंद्रपूर,हल्ली मु मेघा काँक्रीट कंपनी कान्होलिबारा तर आरोपी योगेश अरुण पातूरकर (वय २९) रा हुडकेश्वर ,नागपूर व पंकज गोपाळ पोलनकर (वय २८) रा महेंद्री ता नरखेड जि नागपूर हे तिघेही कारचालक असून कान्होलिबारा परिसरात असलेल्या मेघा कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये कंत्राटी पद्धतीने लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या वाहनांवर चालक म्हणून काम करायचे.त्यांच्यात मैत्री होती.मृतक हा नेहमी आरोपी पेक्षा वरचढ असल्यासारखा वागायचा त्यामुळे आरोपीनी बुधवारी रात्री मृतक पारसला आरोपी योगेश चालवीत असलेल्या झायलो कार क्र एम एच४० एच ०२३१ मध्ये बसवून पिंपळधरा शिवारात नेऊन त्याला गाडीत असलेल्या लोखंडी पाना व दगडाने डोक्यावर वार करून मारून टाकले. व मृतदेह एका शेतात फेकून दिला .योगेश ह्याने साथीदार पंकज ह्याला त्याच गाडीने डोंगरगाव येथे सोडून तो गाडी घेऊन त्याच्या घरी हुडकेश्वर येथे निघून गेला.
पंकज ने आखली योजना…. योगेश निघून जाताच पंकज ने स्वतःच १०० नंबरवर डायल करून गुन्हे नियंत्रण कक्षाला “मी व मृतक सोबत असताना पिंपळधरा परिसरात दोन अज्ञात इसमानी आम्हाला अडविले व माझ्यासमोर पारसवर हल्ला करून फरार झाले”अशी खोटी माहिती दिली. कन्ट्रोल कॉल असल्याने सुरवातीला बुटीबोरी पोलिसांना कळविण्यात आले.
बुटीबोरी पोलीस पोहचले घटनास्थळी ;-
बुटीबोरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख ,पो उ नि अमोल लगड,संजय भारती यांनी अन्य पोलीस कर्मचार्यासह बुटीबोरी पोलीस हद्दीतील संपूर्ण परिसर पालथे घातले. संशयित आरोपी पंकज पोहनकर याच्या मोबाईलच्या लोकेशन वरून रीलायन्स पेट्रोल पंप,बोथली येथून ताब्यात घेऊन घटनास्थळाची माहिती देण्यास सांगितले असता त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.परंतु शेवटी पोलिसांनी हिसका दाखविल्यानंतर हत्या झालेल्या घटनास्थळाचा पहाटे ५ वाजता शोध लागला.घटनास्थळी अज्ञात मृतदेह हा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर प्रकरण पीपळधरा शिवार हे हिंगणा पोलीस हद्दीतील असल्याने बुटीबोरी पोलिसांनी पंकज ला हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले.
हिंगणा पोलिसांनी काही तासातच लावला आरोपीचा शोध……
हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहचताच त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरवात केली. पंकज मात्र पोलिसांसोबत प्रामाणिक असल्यासारखा वागत होता. ठाणेदार राजेंद्र तिवारी यांनी त्याला विचारपूस सुरू केली .तर तो काहीतरी लपवित असल्याचे लक्षात आले त्यानंतर इथे तुम्ही कसे पोहचले ?याबाबत त्याने योगेश च्या गाडीचा उल्लेख करताच हिंगणा पोलिसांनी तात्काळ योगेशला हुडकेश्वर येथील त्याच्या घरून ताब्यात घेतले. योगेशने गुन्ह्याची कबुली दिली .त्यानंतर पंकज ला सुद्धा ताब्यात घेण्यात आले. डीसिपी चिन्मय पंडित , एसीपी शिंदे यांनी घटनास्थळीभेटी दिल्या .पुढील तपास ठाणेदार राजेंद्र कुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर, नितीन कुंभार करीत आहेत