मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले निवेदन
नागपूर: कोरोनामुळे संक्रमित झालेेले व लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांना घरी क्वारंटाईन केले आहे, अशा रुग्णांना शासनातर्फे आरोग्य कीट उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
बावनकुळे यांनी एक निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या कोरोना संक्रमित संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने कोरोनाने संक्रमित झालेल्या रुग्णांना दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने व अपुरी व्यवस्था होत असल्याने अशा रुग्णांना घरीच क्वारंटाईन ठेवण्याचा निर्णय घेतला. पण आर्थिक दुर्बल व मध्यमवर्गीय कुटुंबातील कोरोना संक्रमित रुग्णांना लागणारे औषध व अन्य साहित्य विकत घेण्याची या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाही. अशा रुग्णांना आरोग्य कीट उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांची काळजी घेणे सोयीचे होईल.
थर्मल गन किंवा डिजिटल थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर, ट्रिपल लेअर मास्क, रुग्ण ज्या आरोग्य अधिकार्याकडे वर्ग केला त्याने रुग्णाची काळजी घेणे व नाव, मोबाईल क्रमांकाची नोंद घेणे, डिस्पोजल ग्लोव्हज, कचरापेटी, सॅनिटायझर, साबण, टॉवेल व संपूर्ण औषधाचा समावेश या कीटमध्ये असावा. याप्रमाणे सर्व साहित्य असलेली कीट रुग्णांना पुरवठा करण्याची मागणी बानवकुळे यांनी केली.