नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली त्या घटनेमध्ये आदिवासी जातीची सूची तयार केली होती. त्या सूचीमध्ये आमचं नाव आहे परंतु शब्दाच्या चुकीमुळे आम्ही ६५ वर्षापासून वंचित आहोत ती दुरुस्ती करण्यासाठी सरकारने एक ओळीची शिफारस करायची आहे परंतु सातत्याने आम्ही अभ्यास करतोय, आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही देतो असे सांगून धनगर समाजाची फसवणूक सरकार करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रामराव वडकुते यांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर अल्पकालीन चर्चेत आमदार रामराव वडकुते यांनी भाग घेत सरकारवर आणि त्यांच्या फसव्या घोषणेवर हल्लाबोल केला.
धनगर समाजाच्या मतावर निवडून यायचं आणि सातत्याने समाजाला फसवायचे हे आता लोकांना कळून चुकले आहे. बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. आम्ही विश्वास ठेवला. पण एकदाच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असे नाही. तर अनेक वेळा त्यांनी समाजाला शब्द दिला आहे. मुळात नव्याने जात समावेश करायची असेल तर अभ्यास केला जातो परंतु आमच्या मतावर निवडून येता आणि अभ्यास कसला करता असा संतप्त सवाल आमदार रामराव वडकुते यांनी केला.
आत्तापर्यंत या सरकारने कसलाच अभ्यास केलेला नाही. ज्या समितीने अभ्यास केला त्या समितीने अनुसूचित धनगड आणि अनुसूचित धनगर नाही तर तो नव्याने एखादी जात निर्माण करण्यासाठी केला. म्हणून आमची जी मूळ मागणी आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत नमुद केलेल्या आदिवासी जातीच्या सूचीमध्ये आमचं नाव आहे त्याच्या चुकीच्या शब्दामध्ये दुरुस्ती करा. त्यासाठी सरकार आम्हाला शिफारस देणार आहे की नाही हाच खरा मुद्दा आहे असेही आमदार रामराव वडकुते म्हणाले.
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मेळावा घेतला त्यामध्ये अहिल्यादेवीचे नाव देण्याचे जाहीर केले परंतु एखादया महत्वाच्या व्यक्तीचे नाव दयायचे असेल तर त्याची प्रोसिजर पूर्ण करावी लागते परंतु अशी प्रोसिजर सरकारने पूर्ण केलेली नाही. मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तीने अहिल्यादेवीचा अपमान करणे योग्य नसल्याचे रामराव वडकुते म्हणाले.
सतत समाजाला आश्वासन देवून वारंवार फसवणूक करण्याचे सरकारने थांबवावे. असे किती दिवस समाजाला फसवणार आहात असा सवालही रामराव वडकुते यांनी सरकारला केला.