सोलापूर/महुद: शेतीला लागणाऱ्या खतावर जीएसटी लावता…सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महुद येथील जाहीर सभेत सरकारला केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवशीची पहिली सभा सोलापूर जिल्हयातील महुद येथे झाली. या सभेतही दादांनी सरकावर प्रहार केला. शेतकऱ्यांना नाडणाऱ्या सरकारच्या धोरणावर दादांनी टिका केली. सर्वसामान्य माणूस आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भीतीच्या छायेखाली वावरत आहे.भाजप-सेनेवाले पक्के जातीयवादी आहेत अशी जोरदार टिका केली.
या सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिलं का? धनगर समाजाची मते घेतली आणि आरक्षण दिले नाही.महादेव जानकरांना मंत्री केले म्हणजे धनगर समाजाच्या समस्या सुटल्या का? धनगर समाजाच्या भावनेशी हे सरकार खेळत आहे असा आरोपही दादांनी केला.
शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा सरकारचा एककलमी कार्यक्रम – सुनिल तटकरे
शेतकऱ्यांची अवहेलना,लाभार्थी म्हणून शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा एक कलमी कार्यक्रम या सरकारने राबवला असून या खोटारडया सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महुदच्या जाहीर सभेत केले.
सत्ता ही लोकांची सेवा करण्यासाठी असल्याची शिकवण शरद पवारसाहेबांनी आम्हाला दिली आहे.त्यांच्या शिकवणीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारविरोधी हल्लाबोल करत असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
बळीराजाच्या उत्पादनावर आणि शरद पवार साहेबांच्या धोरणामुळे आपला देश जगातल्या तीन नंबर निर्यात करणाऱ्या यादीत आला आहे असे उदगार सुनिल तटकरे यांनी काढले.
भाजपने १ एप्रिल स्थापना दिवस साजरा करावा – धनंजय मुंडे
भारतीय जनता पार्टीमे आज आपला स्थापना दिवस साजरा करायचा नव्हता तर तो १ एप्रिलला साजरा करायला हवा होता अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महुदच्या जाहीर सभेत केली.
त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये सरकारचे वाभाडे काढले.त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेनेवर जोरदार टिका केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे म्हणतात सत्तेला लाथ मारु…अहो यांनी आत्तापर्यंत मारली का लाथ?त्यामुळेच मी त्यांना दोन प्राणी भेट देणार आहे असे सांगतानाच दादांनी शिवसेनेला गांडूळ म्हटलं म्हणून राग आला.अहो शिवसेनेचं दुटप्पी धोरण आहे म्हणूनच समाचार घेतल्याचे सांगत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
सभेच्या सुरुवातीला सुमारे ७ किलोमीटरची मोटारसायकल रॅली काढून वातावरणनिर्मिती करण्यात आली. सभेच्याठिकाणी सुनिल तटकरे,दादा आणि उपस्थित मान्यवरांना चाबुक भेट देण्यात आला.तर धनगर समाजाच्यावतीने घोंगडी,फेटा,काठी भेट देवून दादा,सुनिल तटकरे,धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,खासदार विजयसिंह मोहितेपाटील,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,माजी आमदार दिपक साळुंखे,माजी आमदार रणजितसिंह मोहितेपाटील,धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे,आमदार जयदेव गायकवाड,ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,प्रशांत बाबर, आदींसह माढा,मंगलवेढा,पंढरपूर,माळशिरस परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.