सिंधुदुर्ग : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्यांनी राज्य सरकार 31 डिसेंबरला पडणार, असा दावा केला. 31 डिसेंबर हा या राज्यातील सरकारचा शेवटचा दिवस असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आमदार अपात्रता प्रकरणात व्हिपवरून कोणताही गोंधळ झालेला नाही. त्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी आणि देशाविषयीचा द्वेष दिसत आहे. देशातून त्यांना लोकशाही संपवायची आहे. परंतु, 31 डिसेंबर ही त्यांना सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेली वेळ आहे. परंतु, त्याआधीच हा निकाल येणे गरजेचे आहे. त्यामुळे या सरकारकडे आता जास्त दिवस राहिलेले नाहीत.
31 डिसेंबरला हे सरकार पडणारच आहे. 2024 ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार,असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल इथे महाविकास आघाडीचा विजय हा पक्का आहे, असेही ते म्हणाले.