मुंबई: महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींची भौगोलिक उपलब्धता व या वनस्पतींच्या संकलनाचे उत्तम काम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने केले आहे. या व अशा पद्धतीच्या संकलन व संशोधनासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
आज महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींच्या माहितीच्या संकलनाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन, आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह या प्रकल्पात सहभागी वैज्ञानिक, तज्ज्ञ उपस्थित होते.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगांतर्गत या प्रकल्पाच्या समन्वयाचे काम आघारकर संशोधन संस्था, पुणे व अन्य १४ संस्थांनी केले. ४ वर्षांच्या परिश्रमातून ही माहिती संकलित करण्यात आली आहे. सुमारे 200 विद्यार्थी क्षेत्रीय कार्यात सहभागी झाले होते. या डेटा बेसमध्ये ४०० वनस्पतींची विविधता आणि उपलब्धता, १५७ महत्त्वाच्या वनस्पतींची सांख्यिकी माहिती, २५३ वनस्पतींच्या औषधी उपयोगाविषयीची माहिती, वनस्पतींची बाजारातील उपलब्धता आणि उद्योगातील वापर याविषयीची माहिती दिली आहे.
औषधी वनस्पतीचा हा डेटा बेस वापरण्यास सोपा असून औषधी वनस्पतींचा वापर करणारे, त्यावर संशोधन करणारे आणि अन्य इच्छुक यांनाही उपयुक्त ठरेल असे मत आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केले. या डेटा बेसवर आधारित ‘महाराष्ट्रातील महत्वाच्या औषधी वनस्पती’ हे पुस्तक आघारकर संशोधन संस्थेच्या डॉ. अनुराधा उपाध्ये आणि डॉ. विनया घाटे यांनी लिहिले आहे. त्याचेही प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.