नागपूर: आदर्श घोटाळयामध्ये आज अशोक चव्हाण यांच्याबाजुने मिळालेल्या निर्णयामुळे भाजपाने निवडणूकीपूर्वी केलेल्या अपप्रचाराची पोलखोल झाली आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
आदर्श घोटाळयाचा २०१४ आधी फार मोठा अपप्रचार भाजपने केला. दिल्लीमध्ये २ जी घोटाळयाबाबतही अपप्रचार झाला. आज आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांना मागच्या राज्यपालांनी प्रोसिक्युट करु नये असा जो निर्णय दिलेला आहे तो योग्य आहे असे आज हायकोर्टाने जाहीर केले. याचाच अर्थ असा की, आदर्श घोटाळ्यात अशोकराव चव्हाण यांना प्रोसिक्युट करण्याची आवश्यकता नाही. त्यात त्यांचा तसा कोणताही सहभाग नाही असे चित्र त्यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्याबाबतीतील निर्णयाने त्यांच्यावर झालेला आरोप बाजुला झाला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
हळूहळू या देशाला कळू लागले आहे की, केंद्रात मोदी सरकार येण्याअगोदर २ जी घोटाळ्याचा अपप्रचार करत होते आणि महाराष्ट्रात फडणवीस सरकारनेही आदर्श घोटाळ्याबाबत रान उठवले होते.परंतु तो अपप्रचार कसा खोटा होता हे समोर आले आहे.
जाहिरातीच्या माध्यमातून वेगवेगळे आरोप करण्यात आले ते सगळे खोटे होते. त्यामुळे पुन्हा मागचे सरकार अच्छे दिन देणारे होते हे समोर आले आहे आणि अच्छे दिन येणार हे सांगणाऱ्या भाजप सरकारची त्यामुळे पोलखोल झाली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.