रस्ते, उद्यान, ग्रंथालय, नाला भिंती बांधकामाची केली पाहणी
नागपूर: शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे अडचणीत आलेले महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी हालचाली सुरू असतानाच ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी संपूर्ण दिवस आपला उत्तर नागपूर मतदारसंघ पिंजून काढला. या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघात सुरू असलेल्या रस्ते बांधकाम, उद्यान निर्मिती आणि इतर विकास कामांची पाहणी केली.
उत्तर नागपूर मतदारसंघात नागरी दलित विकास निधी योजना आणि खनिज विकास निधींतंर्गत मोठ्याप्रमाणात विकास कामे केली जात आहेत. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या कामांसाठी तब्बल १५० कोटींचा निधी खेचून आणला आहे. या निधीतून जागोजागी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधकाम, खडीकरण, डांबरीकरण, फुटपाथ, उद्यान निर्मिती, गटारलाईन आणि नाल्यांच्या भिंतीचे बांधकाम सुरू आहे.
याशिवाय मतदारसंघातील बुद्ध विहारांमध्ये भिक्खू निवासासह इतर सोयीसुविधांचा विकास केला जात आहे. समाजभवन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, योगा केंद्र उभारण्याची कामे सुरू आहेत. यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर असल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयातून डॉ. नितीन राऊत यांनी दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर नझुल ले-आऊट, जरीपटका, महावीरनगर, मिसाळ ले-आऊट, इंदोरा, विश्वासनगर, आहुजानगर, नागार्जून कॉलनी, नारा, आर्यनगर, पवनपुत्र सोसायटी, समतानगर, तारकेश्वरनगर, संन्यालनगर, ठवरे कॉलनी, न्यू ठवरे कॉलनी, चॉक्स कॉलनी, कळमना, कामना नगर, बेला नगर, विशाल नगर, बालाजी नगर, बेले नगर, वाजपेयी नगर, चिंतामणी नगर, तुकाराम नगर, गुलशन नगर, संगम नगर, वांजरा ले-आऊट, यशोधरा नगर, हमीद नगर, टिपू सुलतान चौक, महबूब पुरा, संघर्ष नगर आदी भागांना भेटी देऊन विकासकामांचा आढावा घेतला.
समतानगर भागात अंतर्गत रस्ते नसल्यामुळे येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पालकमंत्र्यांनी सिमेंट रस्त्यांची कामे सुरू केल्यामुळे खुश झालेल्या नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. डॉ. राऊत यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांसाठी आणखी निधी खेचून आणण्याचे आश्वासन दिले.
या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक, जुने सहकारी, मित्र, नातेवाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली.
चैतन्यनगर मैत्री बुद्ध विहाराच्या आवारात क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये सहभागी होऊन डॉ. राऊत यांनी बॅटने चेंडू टोलविण्याचा मनमुराद आनंद लुटला. विकास कामे सुरू असलेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधले.