विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यतेखाली समितीने आरंभिली चौकशी
नागपूर: कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून कंपोस्टिंग करणाऱ्या हंजर बायोटेकच्या कामासंबंधी महापौरांच्या निर्देशानुसार व आयुक्तांच्या मान्यतेनुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली असून या समितीद्वारे चौकशीला प्रारंभ झाला.
ॲड धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यतेखाली पाच सदस्यीय समितीमध्ये जयश्री वाडीभस्मे, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा विधी अधिकारी ॲड.व्यंकटेश कपले प्रामुख्याने उपस्थित होते. सोमवारी सुनावणीला सुरूवात झाली.
गुरूवारी (ता.19 डिसें)ला ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी भांडेवाडी येथील हंजरच्या प्रकल्पाला भेट दिली होती. तेथील कंपोस्टिंग प्रक्रिया व मशीन्सची माहिती जाणून घेतली. या पाहणी दौऱ्यात विभागीय स्वास्थ निरिक्षक व नियंत्रक रोहिदास राठोड यांनी हंजरला मनपाद्वारे उपलब्ध करून देणारा कचरा यांची आकडेवाडी नोंदवहीतून सांगितली. हंजरमार्फत प्रक्रिया करण्यात येणाऱ्या कचऱ्यांची हंजरची नोंदवहीमधील आकडे यामध्ये तफावत दिसून आल्याचे निर्दशनास आले. त्याचप्रमाणे हंजरमार्फत लावण्यात आलेल्या यंत्रसामुग्री कार्यक्षम व सुधारित नसल्याचेही पाहणी दौऱ्याच्यावेळी आढळून आले.
नागपूर महानगरपालिकेने कचऱ्यावर पुनर्वापर करून त्यापासून कंपोस्टिंग तयार करण्यासाठी हंजर बायोटेकची नेमणूक 15 एप्रिल 2009 साली केली होती. यासंबंधीचा 12 वर्षाचा कार्यादेशही देण्यात आला होता. करारान्वये हंजरला प्रति दिवस 600 मेट्रिक टन कचरऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित होते. हंजरला हा प्रकल्प बांधणे, वापरणे, कालावधी संपल्यानंतर हस्तांतरित करणे (BOOT,BUILD,OPERATE,TRANSFER) या तत्त्वावर देण्यात आला. हंजर बोयटेक मार्फत भांडेवाडी येथील कचऱ्यावर पुनर्वापर करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकल्पाला आग लागली होती. ही लाग लावली की लावण्यात आली होती, असा सवाल सभापती धर्मपाल मेश्राम यांनी यापूर्वीही सभागृहापुढे उपस्थित केला होता.
या प्रकरणात अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, उपअभियंता राजेश दुपारे यांनी आपले निवेदन लेखी स्वरूपात समितीपुढे सादर केले आहे. चौकशी समितीने हंजरला कार्यादेश दिल्यापासून मनपाचे संबंधित अधिकारी त्तकालिन आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद गणवीर, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, कार्यकारी अभियंता डी.डी.जांभूळकर, अनिरूद्ध चौंगजकर, श्याम चव्हाण यांच्यासह हंजर कंपनीचे संचालक यांना बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात आले होते.
आज झालेल्या समितीच्या बैठकीत विभागीय स्वास्थ निरिक्षक व नियंत्रक रोहिदास राठोड यांनी हंजरला पुरविण्यात येणारा कचरा व तेथील सध्यस्थिती तसेच हंजर बायोटेकचा प्रकल्प संचालक राजेश तिवारी यांनी प्रकल्पामार्फत तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्टिग व उपलब्ध यंत्रसाधने याबाबत दिलेले मौखिक निवेदन समितीने नोंदविले.
पुढील सुनावणी २० जानेवारी दुपारी ३ वाजता विधी समिती सभापती यांच्या कक्षात होणार असल्याची माहिती विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांनी दिली. या सुनावणीप्रसंगी संपूर्ण कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश समितीने दिले.
या सुनावणीनंतर अंतीम अहवाल समितीपुढे सादर केला जाईल. या प्रकरणात दोषी असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.