नागपूर: कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) च्या सुवर्ण महोत्सवी उत्सवाचा एक भाग म्हणून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) द्वारे नागपूर महानगरपालिकेच्या डॉ. राममनोहर लोहिया शाळेमध्ये ‘हॅपी स्कूल’ प्रकल्प सुरू केला आहे. मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२४) या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डब्ल्यूसीएलचे वित्त संचालक बिक्रम घोष होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षणाधिकारी साधना सयाम, शाळा निरीक्षक सीमा खोब्रागडे, मुख्याध्यापिका सुनंदा लोखंडे, डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशनच्या मैत्रेयी जिचकार उपस्थित होत्या.
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या सीएसआर निधीमधून हॅपी स्कूल प्रकल्प ‘बिल्डिंग अॅज लर्निंग एड (बाला)’ संकल्पनेतून सरकारी शाळांची पुनर्रचना करण्यावर लक्ष केंद्रित करतो. नागपूर महापालिकेच्या पाच शाळांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे १०५५ विद्यार्थ्यांना थेट फायदा होईल.
शुक्रवारी (ता.२४) श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते अत्याधुनिक वर्गखोल्यांचे अनावरण करण्यात आले. शैक्षणिक सत्र २०२४-२६ च्या तराश बॅचसाठी निवडलेल्या मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. डॉ. राममनोहर लोहिया शाळेतील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
डब्ल्यूसीएलच्या या स्तुत्य उपक्रमाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.