नागपूर: शहरातील अमरावती रोडवर असलेल्या धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट घडला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून इतर ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकूण ५ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
धामना येथील घटना दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. त्या घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नक्कीच दुःख झाले आहे. त्यामुळे मी विनंती केली होती या घटनेमुळे कुठलेही स्वागत समारंभ, जल्लोश किंवा मिरवणूक काढू नये. मी मृतकांच्या आत्म्यांना शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गडकरी काल नागपुरात दाखल झाले. धामना येथील घटनेमुळे स्वागत समारंभ व मिरवणूक रद्द करावी, असे आवाहन त्यांनी अगोदरच भाजप कार्यकर्त्यांना केले होते. मात्र ते झुगारून विमानतळावर शेकडो कार्यकर्ते स्वागतासाठी आले होते.