नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेनंतर दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे आम आदमी पक्ष तसेच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकाही केली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य करत सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला.
विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ‘इंडिया आघाडी’ची स्थापना केल्यानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. २०२४ च्या निवडणुकीला सामोर जाण्यासाठी भाजपला आत्मविश्वास राहिला नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष फोडणे सुरू केले आहेत. पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार आहे,असे म्हणत राऊत यांनी भाजपवर ताशेरे ओढले.
शिवसेनेतून तुटलेला एक गट, राष्ट्रवादीतून तुटलेला एक तुकडा आणि मग इतर सगळे गोळा केलेले ताकडे-तोकडे जुळवले आहेत, मूळ एनडीए कुठे आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.