Published On : Wed, Jun 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रातील सर्व निवडणुका महायुतीत लढणार – चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

• प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय | • भाजपा शिवसेनेसह महायुतीमध्ये ९ पक्षांचा समावेश

महाराष्ट्रात येत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका भाजपा महायुतीमधील नऊ मित्रपक्षांसोबत समन्वयाने लढणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपा, शिवसेना यांच्यासह समविचारी नऊ पक्षांची बैठक झाली, त्यानंतर श्री बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
महाराष्ट्रातील ४५ पेक्षा अधिक लोकसभा व २०० हून अधिक विधानसभा जागांवर महायुतीने विजय मिळविण्याचा निर्धार करण्यात आला, असे सांगून श्री बानवकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाला. अद्याप कोण किती जागांवर लढणार याचा निर्णय झाला नसला तरी देखील सर्व पक्षाचे नेते कोणत्या निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवतील याचा निर्णय सर्व नऊ घटक पक्षांच्या समन्वयाने महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे घेतील.

• निवडणुकीसह सरकारमध्येही वाटा
महायुतीमधील सर्व घटकपक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागांमध्ये व सत्तेत आल्यावर सरकारमध्ये देखील सर्वांना वाटा मिळावा यासंदर्भात सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केली. सर्वांनी एकत्रिकरणाची मूठ बांधली, असे श्री बावनकुळे यांनी सांगितले.

• मविआच्या मनात पराजयाची
महाविकास आघाडी स्वत:च भाजपाची बी टीम झाली आहे, अनेक नेते भाजपात प्रवेश करीत आहेत. मविआचे दहा मुख्यमंत्र्याचे दावेदार आहेत, आमच्याकडे असे काहीच नाही. त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कुणाला बी टीम म्हणावे हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे ते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी वेगवेगळी विधाने केली जात आहे.

• केसीआर आले त्याच वेगाने परत जातील
केसीआर यांना महाराष्ट्र समजण्यास वेळ लागेल, ते येतील जातील, त्यांची चिंता करण्याची आम्हाला गरज नाही, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, ते ज्या वेगाने आले त्याच वेगाने परत जातील. त्यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही असाही टोला श्री बावनकुळे यांनी लागवला.

• महायुतीमध्ये या पक्षांचा समावेश
भाजपा, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपल्बिकन पार्टी (कवाडे), शिवसंग्राम (विनायक मेटे), बहुजन रिपब्लिक एकता मंच (सुलेखा कुंभारे), रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी (महादेवराव जानकर)