मनपा-ग्रीन व्हिजिलतर्फे लक्ष्मीभुवन चौकात जनजागृती
नागपूर : पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश हा अंधार दूर करणारा असतो. या दिवशी अनावश्यक वीज दिवे बंद केल्याने मोठी वीज बचत होऊ शकते, हे हेरून मनपाने ग्रीन व्हिजिल या संस्थेच्या सहकार्याने जनजागृती सुरू केली. लोकसहभाग मिळू लागला. लाखो युनीट विजेची बचत झाली. खऱ्या अर्थाने हा नागपूरकरांचा उपक्रम असून ‘पौर्णिमा दिवस’ म्हणून या उपक्रमाची देशात ओळख तयार झाली असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
नागपूर महानगर पालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (ता. २१) लक्ष्मीभुवन चौकात आयोजित ‘पौर्णिमा दिवस’ या जनजागृती उपक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी पौर्णिमा दिवस संकल्पना मांडणारे माजी महापौर प्रा. अनिल सोले, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक अमर बागडे उपस्थित होते. महापौर दयाशंकर तिवारी यांनी कोरोना काळानंतर पुन्हा नव्या दमाने हा उपक्रम सुरू केल्याबद्दल ग्रीन व्हिजील स्वयंसेवकांचे व मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. माजी महापौर तथा माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी या उपक्रमामागची पार्श्वभूमी विषद केली. नागपूरकरांच्या सहभागामुळे आणि ग्रीन व्हिजीलच्या अथक परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या आणि परिणामकारकरीत्या पुढे जात असल्याचे सांगितले.
मनपा व ग्रीन व्हिजिलच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक पौर्णिमेला नागपूरकरांना रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. यासोबतच शहरातील एका चौकात व त्या परिसरात ग्रीन व्हिजिलचे स्वयंसेवक जनजागृती करतात. व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे बंद करण्याची विनंती करतात. त्यानुसार रविवारी (ता. २२ ) लक्ष्मीभुवन चौकात महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, विकास यादव, श्रिया जोगे, अश्विनी दाबले आदिंनी व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. व्यापारी व नागरिकांनी स्वयंसेवकांच्या विनंतीला मान देत या उपक्रमात वीज दिवे बंद करून सहभाग नोंदवला. मनपाच्या वतीनेही काही पथदिवे बंद करण्यात आले होते. काही व्यापाऱ्यांनी प्रत्येक पौर्णिमेला रात्री एक तास अनावश्यक वीज दिवे बंद ठेवणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. मानकर, जी.एम. तारापुरे, सचिन फाटे हे उपस्थित होते.
कोरोनाकाळात पडला खंड
तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम मागील सात वर्षांपासून अविरत सुरू आहे. या माध्यमातून आतापर्यंत नागपूरची लाखो युनीट वीज बचत झाली. मात्र कोरोनामुळे मागील दीड वर्ष या जनजागृतीच्या उपक्रमात खंड पडला. मात्र यापूर्वी जनजागृतीदरम्यान जुळलेल्या लोकांनी लॉकडाऊन असला तरी घरचे अनावश्यक दिवे प्रत्येक पौर्णिमेला बंद ठेवल्याची माहिती ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चॅटर्जी यांनी दिली.