Published On : Sun, Dec 1st, 2019

विकासाच्या प्रवाहात प्रत्येक घटकाला समाविष्ट करण्यासाठी ‘इंटर-सिटी फोरम’ महत्वाचे

Advertisement

उपमहापौर मनिषा कोठे : ‘इंटर-सिटी फोरम’चे उद्घाटन

नागपूर, : जनतेच्या हितासाठी, त्यांच्या जीवनमानात वृद्धी करण्यासाठी शहरात सर्वांगिण विकासाची संकल्पना राबविणे आवश्यक आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हीजनरी नेतृत्वातून अनेक कामे झाली. या कामांमुळे सर्वसामान्यांना होणारा लाभ, सर्वसामान्यांना विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करणे आणि विकासाच्या प्रवाहातून कोणतेही घटक वंचित राहू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये विचारांचे आदान-प्रदान होणे आवश्यक आहे. विकास प्रक्रियेच्या संकल्पनांच्या आदान-प्रदानासाठी ‘इंटर-सिटी फोरम’ महत्वाची भूमिका बजावणार, असा विश्वास उपमहापौर मनिषा कोठे यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (एआयआयएलएसजी) यांच्या वतीने इक्विसिटी प्रोजेक्ट अंतर्गत शनिवारी (ता.३०) रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे ‘इंटर-सिटी फोरम’चे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर मनिषा कोठे यांच्या हस्ते ‘इंटर-सिटी फोरम’चे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, माजी महापौर नंदा जिचकार, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, अमरावती शहराचे महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे विभागीय संचालक जयंत पाठक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे तांत्रिक संचालक पशिम तिवारी, डॉ.अमृता आनंद आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही : नंदा जिचकार
चर्चा सत्रात माजी महापौर नंदा जिचकार यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट/गव्हर्नन्स या विषयावर मत मांडले. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि जनता यांच्या योग्य समन्वयाची गरज आहे. समन्वयाअभावी आपण प्रगती साधू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे नागरिकांना मुलभूत सुविधा प्रदान करण्यात येतात. मात्र या सुविधांसह नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांच्यात आपल्या संस्थेविषयी सकारात्मकता निर्माण करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या महानगरपालिकेंवरील विश्वासाने ते आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार करतात. त्यामुळे शहराच्या विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. याशिवाय शहरात काम करणा-या स्वयंसेवी संस्थांचीही भूमिका अत्यंत महत्वाची असते. कोणत्याही शहराचा विकास हा लोकसभागाशिवाय शक्य नाही, असे यावेळी माजी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

शहर विकासाच्या ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’चे अनुकरण व्हावे : राम जोशी
शासन संस्थेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व वेगळे आहे. अंमलबजावणी व धोरण निर्मितीसाठी एकच बॉडी असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्वही मोठे आहे. या सर्वांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून योग्य अंमलबजावणी केल्यास मिळणारा निकाल हा उत्तम असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांची शहराच्या विकासासाठी भूमिका महत्वाची असते. शहरातील मुलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणी यासाठी प्रत्येक शहरासाठी नवनवीन संकल्पना असतात. नागपुरात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने बदललेले १८ यूपीएचसीचे बदललेले रूप, इनोव्हेशनसाठी माजी महापौर नंदा जिचकार यांनी घेतलेला पुढाकार हे शहर विकासातील ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’पैकी एक आहेत. अशा अनेक ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ वेगवेगळ्या शहरांमध्ये राबविले जातात. यांचा आपल्या शहराच्या दृष्टीने अभ्यास करून त्याचे अनुकरण केल्यास शहर विकासाला गती मिळेल, असा विश्वास मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी व्यक्त केला.

पर्यावरण केंद्रीत विकासाची गरज : डॉ.रामनाथ सोनवणे
आज सगळीकडे शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची गरज आहे. अशा विकासाअभावी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. खेड्यांचा देश म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश झपाट्याने शहरीकरणाकडे वाटचाल करत आहे. आजघडीला ३८ टक्के गावांचे रूपांतर शहरात झाले आहे. २०५० पर्यंत ही टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत असेल. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊनच आपणाला वाटचाल करावी लागेल. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज आपल्या शहरांचा शाश्वत विकास साधताना पर्यावरणाला डावलून चालणार नाही. अन्यथा विकासाऐवजी विनाशच होईल. त्यामुळे भविष्याचा विचार करता आज पर्यावरण केंद्रीत विकासाची गरज आहे, असे मत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी व्यक्त केले.

विकास प्रक्रियेत रोजगार, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी बाबींचा समावेश झाल्यास ख-या अर्थाने शाश्वत विकासाची संकल्पना पूर्णत्वास येईल. आपल्याला शाश्वत विकासातून चांगला, उत्तम आणि उत्कृष्ट असा प्रगतीचा आलेख गाठायचा आहे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी नवनिर्वाचित उपमहापौर मनिषा कोठे यांच्यासह माजी महापौर नंदा जिचकार, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसूम साहु यांचा शाल, स्मृतीचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी, शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.मनोज साल्पेकर यांनी केले.

Advertisement