मुंबई: उद्योगधंदे उभारणीकरीता नागोठणे येथील आयपीसीएल कंपनीने स्थानिक नागरीकांच्या शेतजमिनी अधिग्रहीत केल्या होत्या त्यावेळी त्यांना दिलेल्या आश्वासनांची कंपनीकडुन आजपर्यंत पुर्तता करण्यात आलेली नाही त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहात केली.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यालगत असलेल्या नागोठणे भागात अनेक शेतजमिनी या विविध उद्योग उभारणीसाठी आयपीसीएल कंपनीसाठी अधिग्रहीत केल्या होत्या. यावेळी कंपनीकडुन प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळणे, नोकरीत सामावुन घेणे, वैद्यकीय मदत देणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे यासारखी अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु आजपर्यंत यातील कुठलीही बाब कंपनी प्रशासनाकडून पुर्ण करण्यात आलेली नाही.
कंपनीत काही प्रकल्पग्रस्त हे निवृत्त झाले असुन त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातुन आश्वासित सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी आवाज उठविला आहे. त्यात प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीत सामावुन घेणे, निवृत्त कामगारांचे पेंशन वाढवुन मिळणे, कामगारांच्या निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० करणे, वैद्यकीय सेवा पुरविणे यासारख्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य करणेसाठी लढा पुकारला आहे असे आमदार सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.
सदर मागण्या अद्याप अपुर्ण असल्याकारणाने तसेच अनेक वेळा मागणी करुनही मागण्या पुर्ण न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या मागण्या कंपनीमार्फत पुर्ण करण्यात याव्यात किंवा कंपनीविरोधात कारवाई करावी अशी मागणी आमदार सुनिल तटकरे यांनी केली.