लातूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून माराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.आता लातूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे.लातूर तालुक्यातील 30 पेक्षा अधिक गावातील रहिवाश्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. इतकेच नाही तर गावकऱ्यांनी या 30 गावांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रवेशालाच बंदी घातली.सोबतच या गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चित्र दिसत आहे.
मराठा आरक्षणासाठी लातूर तालुक्यातील गादवड येथे मागील आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान, या साखळी उपोषणादम्यान रविवारी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या भागातील मांजरा पट्ट्यातील 30 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ गावातील खंडोबा मंदिरात घेतली. सोबतच, बहिष्कार टाकलेल्या या तीस गावांमध्ये राजकिय नेत्यांना गावबंदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाची धग आता गावागावात पोहचल्याने सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.