Published On : Thu, Nov 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपासाठी ठरणार डोकेदुखी !

– राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. राज्यातील काही भागांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले होते. ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून राजकीय नेत्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली होती. मात्र, मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडण्यास नकार दिल्याने कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारने सोडवावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मराठा आंदोलनाबाबत नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी-
राज्यात मराठा आरक्षणाची आग भडकत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता जेवण बंद करून पाणी पिणेही बंद केले आहे. मनोज यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल (बुधवार) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकाने सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे तसेच सरकारला वेळ द्यावा, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. मात्र मनोज जरांगे त्यांचा भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आंदोलक राजकीय नेत्यांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उद्धव ठाकरेंना सर्वपक्षीय बैठकीत आमंत्रण नाही –
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करून ठराव करण्यात आले. पण, सरकारने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीचे उद्धव ठाकरेंनाच निमंत्रण न दिले गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावरून ठाकरेंच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्यही केले. खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर शिंदे सरकारवर आगपाखड केली. राऊतांनी बैठकीचे पत्र ट्विट करत म्हटलं की, “या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही.शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण, प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे, अशी टीका राऊतांनी केली.

दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु –
राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण आंदोलन सरकारसाठी धोक्याचे –
मराठा समाजाच्या तरुणाने केलेल्या आत्महत्येनंतर धनगर समाजाच्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शिंदे, फडणवीस, पवार सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात जातीय जनगणना करण्याच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत घेराव घातला, तर सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे त्यांना काळे झेंडे दाखविले होते. त्यामुळे मराठा आंदोलन सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement