नागपूर : पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे नागपूर ग्रामीण सरचिटणीस होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना मध्यप्रदेश मधून अटक केली आहे.
आदि आणि मंडला उर्फ छोटू, मूळ मध्य प्रदेशातील मांडला येथील रहिवासी आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चैकशी सुरु केली आहे. पोलिस या हत्येचा तपास संभाव्य राजकीय वैमनस्यसह वेगवेगळ्या कोनातून करत आहेत. मृतक राजू डेंगरे हे माजी सरपंच असून नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाला होता.
हल्लेखोर डेंगरे यांच्या कारसह पळून गेले मात्र नंतर त्यांचा अपघात झाला. या कार अपघातात या दोन्ही संशयित आरोपींना दुखापत झाली होती. या वरूनच पोलिसांनी त्यांना अटक केली.
राजू डेंगरे हे पाचगाव येथे ढाबा चालवतात. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी डोंगरे यांच्यावर लाठ्या आणि दगडांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी काउंटर मधील पैसे आणि मृतकाची कार घेऊन घटनास्थळाहून पलायन केले. मात्र, नंतर आरोपीच्या कारला अपघात झाला अणि नंतर आरोपींनी विहीरगाव येथील नगनदीच्या पुलाजवळ कार तिथेच सोडून तिथूनही पळ काढला होता .