· ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाला उर्त्स्फूत सहभाग
· राज्यात सर्वाधिक 30 टक्के काम पूर्ण
· अडीच लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका
· साडेतीन हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ
नागपूर: महाराष्ट्र समृध्दी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार असून या महामार्गाच्या माध्यमातून कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्यामुळे हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने हिंगणा तालुक्यातून सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक 30 टक्के जमीन खरेदीचे काम पूर्ण झाले असून येत्या एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त हिंगणा येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात संवाद पर्व आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. कोळेकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे, तहसिलदार प्रताप वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते.
समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातून जमीन खरेदीला सुरुवात झाली असून या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूतीने सहभाग दिल्यामुळे राज्यात सर्वाधिक जमीन उपलब्ध झाल्याचे सांगतांना बाळासाहेब कोळेकर म्हणाले की, शेतकरी व ग्रामीण जनतेला केंद्रस्थानी माणून त्यांच्या प्रगतीसाठी विविध योजनाची अंमलबजावणी सुरु आहे. लाभ देण्यासाठी सर्वच प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असल्यामुळे योजनेच्या लाभासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतकरी कर्जमाफीच्या महत्वकांक्षी निर्णयानुसार शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी नि:शुल्क सर्व सुविधा व संग्राम केंद्रावर व्यवस्था करण्यात आली असून शंभर टक्के शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करताना हिंगणा तालुक्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यापैकी एक हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे.
अडीच लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका
कृषी उत्पादन दुप्पट करण्याच्या महत्वकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना शेत जमिनीसंदर्भात आवश्यक असलेले घटक द्रव्यांची माहिती उपलब्ध व्हावी व त्यानुसार पिकांचे नियोजन करता यावे यासाठी शेतकऱ्यांना मृद्रा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. जिल्हयात अडीच लाख शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी शेतकऱ्यांना संवाद पर्वात मार्गदर्शन करताना दिली.
मृद्रा आरोग्य पत्रिकेसोबतच मागील दोन वर्षात 90 हजार जमिनीचे सॅम्पल गोळा करण्यात आले असून त्यानुसार उपयुक्त पीक पध्दतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. टिंबक सिंचनासह मागेल त्याला शेततळे, कृषी अवजारे टॅक्टर आदी योजनांचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात येत असल्याचे सांगतांना श्री. शेंडे पुढे म्हणाले की, वैयक्तिक लाभाच्या योजनासह सामुहिक योजनांचा लाभासाठी गोदाम बांधकाम, समूह गट शेती आदी योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृद्रा आरोग्य पत्रिका उपक्रमामध्ये हिंगणा तालुक्यात उत्कृष्ट काम झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी संवाद पर्वच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती शेतकरी व सामान्य जनेतेपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला असून दिनांक 15 सप्टेंबर पूर्वी कर्जमाफी ऑनलाईन अर्ज करुन शंभर टक्के शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी या संदर्भात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत केलेल्या संवादाची पुस्तिका तसेच आपला जिल्हा नागपूर ही पुस्तिका सर्वांना दिली.
जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे यांनी शासनाच्या विविध योजनांच्या लाभ प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संवाद पर्व हा कार्यक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. सर्व माध्यमाद्वारे सुध्दा लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संघातर्फे पुढाकार घेण्यात येईल असे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन तहसिलदार प्रताप वाघमारे यांनी केले. शेतकरी कर्जमाफी संदर्भात हिंगणा तालुक्यात 14 सेतू केंद्र व 39 गावस्तरावरील संग्राम केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज पध्दती सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच तहसिल कार्यालयात व महसूल मंडळ कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर सुध्दा ऑनलाईन अर्ज करुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.