मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ ही खरेदी विक्री संघ व पणन संस्थांची शिखर संस्था आहे. हमीभावाने भरड धान्य व धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. राज्याच्या समृद्धीसाठी पणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाद्वारे अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 60वी वार्षिक सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. यावेळी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या उत्पादनाचे महाराष्ट्राच्या नावाने ब्रॅण्ड विकसित होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरेदी-विक्री संघाने कार्य केले पाहिजे. विविध कार्यकारी संस्थांनी शेतकऱ्यांना सभासद करुन घ्यावे. गाव समृद्ध झाले तर राज्य समृद्ध होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाकडे अधिक लक्ष देऊन महासंघाने कार्य करावे, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
श्री. म्हसे म्हणाले, फेडरेशनने या वर्षी शेतकऱ्यांना उत्पादनाचा चांगला भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर क्लीनिंग व ग्रेडींग मशिन्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्वत:चे संकेतस्थळ www.mahamarkfed.org विकसित केले असून फेडरेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असणार आहे.