नागपूर : आपल्या कल्पकतेने ऑटोरिक्षाला रुग्णवाहिकेत बदलून गरजू कोरोना बाधित नागरिकांची नि:शुल्क मदत करणारे ऑटोरिक्षा चालक श्री. आनंद वर्धेवार यांचा स्नेहील सत्कार महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (१२ मे) रोजी महापौर कार्यालयात केला.
यावेळी महापौर म्हणाले की वर्धेवार यांनी नवीन आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. कोरोनाच्या भीतीने ऑटोरिक्षा चालक रुग्णांना रुग्णालयात न्यायला तयार नसतात परंतु वर्धेवार यांनी आपल्या ऑटोरिक्षामध्ये ऑक्सीजन सिलेंडर लावून त्यांना कठिण परिस्थीतीमध्ये रुग्णालयात नेण्याचा संकल्प केला आहे. यामुळे नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोठी मदत झाली आहे. आतापर्यंत त्यांनी १२ कोरोना बाधितांना रुग्णालयात दाखल केले आहे.
विदर्भ टाईगर ऑटोरिक्षा संघटनेचे मार्गदर्शक विलास भालेकर यांनी ऑक्सीजन सिलेंडर संघटनेकडून दिले तसेच प्रादेशीक परिवहन विभागाकडून आवश्यक मंजूरी प्राप्त करुन दिली. कोषाध्यक्ष अशोक न्यायखोर यांनी सांगितले की आणखी काही ऑटोरिक्षा चालक हया कार्यात सहकार्य करायला तयार आहेत.
श्री. वर्धेवार यांनी सांगितले की त्यांच्या ऑटो मध्ये दोन रुग्णांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला. त्यानंतर ऑटोरिक्षा मध्ये ऑक्सीजन सिलेंडर ची व्यवस्था करेल, असे त्यांनी ठरविले. खाजगी रुग्णवाहिकांचे चालक भरमसाठ शुल्क आकारतात आणि गरीब माणूस ते शुल्क देऊ शकत नाही. हे सगळे पाहून याची प्रेरणा मिळाली. सध्या सिलेंडर खूप मोठे असल्याने त्रास होते. मी लहान सिलेंडरसाठी प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे व लकडगंज झोन सभापती श्रीमती मनीषा अतकरे उपस्थित होते.