नागपूर: जून महिन्यातील २७ तारखेला झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला. महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल व पदाधिकाऱ्यांनी शहरातील अशा भागांचा दौरा करून पाहणी केली. नागरिकांशी चर्चा केली. यापुढे होणाऱ्या पावसात अशी परिस्थिती उद्भवणार नाही यादृष्टीने काही उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर आणि आयुक्तांनी दिले होते. ती कामे झालीत की नाही याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार ७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, भा.ज.पा. प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, सर्व कार्यकारी अभियंता, प्रमुख अग्निशमन अधिकारी, सर्व सहायक आयुक्त व सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी झोन निहाय सांगितलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रत्येक झोनअंतर्गत येणाऱ्या परिस रामध्ये २७ जून रोजी झालेल्या पावसात ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणी भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी काय-काय उपाययोजना केल्या, याची माहिती सहायक आयुक्त आणि संबंधित झोनच्या अभियंत्यांनी दिली. नरेंद्र नगर पुलाखाली दरवर्षी पाणी साचून मार्ग बंद होतो. या पुलाला असलेले आऊटलेट नाल्याला समांतर असल्याने अशी परिस्थिती तेथे उद्भवते. आता हा आऊटलेट दोन फूट उंच केला असल्याची माहिती मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी दिली. यापुढे ५० मिमीच्या वर पाऊस आला तर तेथे साचलेल्या पाण्याचा एक ते दीड तासात निचरा होईल, असे कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर यांनी सांगितले.
झोन क्र. ३ (तीन) मधील ज्या भागात पाणी निचरा होण्याची व्यवस्था नाही त्या भागात हायड्रॉलिक टेस्टींग करून सर्व्हे करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी झोनच्या अभियंत्यांना दिले. ज्या ठिकाणी अतिक्रमणाचा अडथळा येत आहे तेथे तातडीने कायदेशीर कारवाई करून नाले-नाल्या मोकळे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हुडकेश्वर पुलाची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, त्यातील अडथळे, आपत्ती व्यवस्थापन याविषयी अभ्यास करुन तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. ओंकारनगर मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत नासुप्रला गटारव्यवस्थेसंदर्भात पत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. झोन क्र. ५ (पाच) अंतर्गत येणाऱ्या अब्बूमियाँ नगर, तुलसीनगर येथील भागात आजही पाणी आहे. यासंदर्भातही नासुप्रला पत्र देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
झोन क्र. ७ (सात), ८ (आठ), ९ (नऊ) या भागात सेप्टिक टँक संदर्भात नागरिकांच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न गंभीर आहे. तातडीने मनपाकडे उपलब्ध असलेल्या गाड्या पुरवून वेळ पडली तर खासगी गाड्या किरायाने घेऊन त्याची सफाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. नाईक तलाव, लेंडी तलावाचे पाणी ज्या माध्यमातून चांभार नाल्यात जाते तो भाग भूमिगत आहे. यासंदर्भात नासुप्रसोबत बैठक घेऊन ते स्वच्छ करण्यासंदर्भात तोडगा काढावा, असेही आयुक्त मुदगल यांनी सांगितले.
खड्डे तातडीने बुजवा : महापौर
पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. २७ जून नंतर पाहिजे तसा पाऊस आला नाही. या काळात या खड्ड्यांना बुजविणे आवश्यक होते. याची कारणेही त्यांनी विचारली. यापुढे कुठलेही कारणे न देता खड्ड्यांची विल्हेवाट तातडीने लावण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वसंतनगरला आयुक्त देणार भेट
२७ जूनच्या पावसात निरी कॉलनी आणि वसंतनगर भागातील सात ते आठ घरात पाणी शिरले. ते पाणी आजही तसेच आहे. अखेर त्या नागरिकांना इतरत्र बस्तान मांडावे लागले. त्या परिसरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता कामाच्या ठेकेदारामुळे ही परिस्थिती उद्भवल्याची बाब सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी लक्षात आणून दिली. तेथे असलेल्या चेंबरची झाकणे चेंबरमध्ये पाडल्या गेली. यामुळे पाणी थांबले. २२ फूट खोल चेंबरमध्ये अशा परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांना उतरविणेही कठीण झाले होते, अशी माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली. ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई घ्यावी, अशी सूचना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त अश्विन मुदगल शनिवारी या भागाला भेट देणार आहेत.
ओसीडब्ल्यूच्या कामाचे होईल निरीक्षण
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ओसीडब्ल्यूतर्फे रस्ते खोदण्यात आले. मात्र, आता कामे सुरू नसतानाही ते पूर्वीसारखे केले नाहीत, ही बाब उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांनी महापौर आणि आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे आयुक्तांनी सदर कामांची पाहणी मनपा यंत्रणेकडून करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांना दिले.