Published On : Thu, Feb 13th, 2020

निर्धारित वेळेनंतरही महापौरांचा ‘जनता दरबार’ सुरूच

Advertisement

नेहरूनगर झोनमध्ये १३० तक्रारींवर सुनावणी

नागपूर : नेहरूनगर झोनमध्ये महापौर संदीप जोशी यांच्या ‘जनता दरबारा’त तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. नागरिकांच्या तक्रारींसाठी महापौरांनी सकाळी १० ते दुपारी १ ही वेळ निर्धारित केली आहे. मात्र बुधवारी (ता.१२) नेहरूनगर झोनमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा ओघ पाहता महापौरांचा जनता दरबार दुपारी ३ वाजतापर्यंत सुरूच राहिला. महापौर संदीप जोशी यांनी ‘जनता दरबारा’त आलेल्या प्रत्येक नागरिकाची तक्रार ऐकून घेत त्यावर सुनावणी केली.

याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, झोन सभापती समिता चाकोले, विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका स्नेहल बिहारे, वंदना भुरे, रेखा साकोरे, नगरसेवक हरीश दिकोंडवार, सहायक आयुक्त स्नेहा करपे आदी उपस्थित होते.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बुधवारी (ता.१२) नेहरूनगर झोनमधील जनता दरबारात तब्बल १३० तक्रारींवर महापौरांनी सुनावणी केली. जनता दरबारमध्ये नेहरूनगर कार्यालयात ७५ तक्रारींची नोंदणी झाली होती. वेळेवर नव्या ५५ तक्रारी स्वीकारण्यात आल्या. संपूर्ण १३० तक्रारकर्त्यांशी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्तिगत संवाद साधला.

जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी मलवाहिनी व अतिक्रमण संदर्भात होत्या. याव्यतिरिक्त वाढीव संपत्ती कर, उद्यानांमध्ये ग्रीन जिमची व्यवस्था, शौचालय व प्रसाधनगृहाचे काम सुरु करणे, बोअरवेल दुरुस्त करणे, दिव्यांग बांधवांसाठी लोडर ई-रिक्षा ची मागणी, मोकाट कुत्र्यांची नसबंदी अशा विविध विषयांवर नागरिकांनी तक्रारी मांडल्या.

दिघोरी परिसरातील रहिवासी भागात वेश्या व्यवसाय चालत असल्याची तक्रार नागरिकांनी यावेळी केली. यावर गांभीर्याने दखल घेत महापौरांनी संबंधित पोलिस अधिका-याशी संपर्क साधला. मनपाच्या संबंधित अधिका-यांनी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सदर भागात तातडीने कारवाई करून व्यवसाय बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

झाडांच्या फांद्या कापण्यासाठी १५ दिवसांपासून तक्रार करूनही त्यावर कोणतिही कारवाई होत नाही. विभागाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार अमृत कुडे यांनी केली. यासंदर्भात संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करावी. कार्यवाही न झाल्यास संबंधित कर्मचा-यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला.

नेहरूनगर झोनमधील काही परिसरांमध्ये वारंवार गडरलाईन चोक होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अशा तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांनी निरीक्षकासह मोका पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

विजय भोयर यांनी मारोती देवस्थानच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार मांडली. यावर महापौरांनी कार्यकारी अभियंता यांना यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

परिसरातील खासगी दवाखान्यापुढे असामाजिक तत्वांचा वावर आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांसह परिसरातील नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात येत्या दोन दिवसात मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सदर ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement