Published On : Tue, Sep 1st, 2020

नवनवीन कल्पनांना मनपाने बळ दिले !

Advertisement

भावपूर्ण निरोप समारंभात मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांचे उद्‌गार


नागपूर : नागपूर महानगरपालिका ही अशी संस्था आहे, ज्यामध्ये तुमच्या कल्पनांचा विस्तार करण्यास वाव आहे. तुमच्या डोक्यात जी कल्पना आली, ती मांडा. सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांची ती अंमलात आणण्यासाठी साथ मिळते. ती लवकर पूर्णत्वास जाते. माझ्या अशाच कल्पनांना मनपाने बळ दिले, असे भावोद्‌गार महानगरपालिकेच्या मुख्य अभियंतापदावरून सचिव पदावर बढती झालेले उल्हास देबडवार यांनी काढले.

नागपूर महानगरपालिका लोककर्म विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर असोशिएशनच्या वतीने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात नुकताच त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती विजय झलके होते. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक भगवान मेंढे, नवनियुक्त मुख्य अभियंता लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कॉन्ट्रॅक्टर असोशिएनशचे अध्यक्ष विजय नायडू यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता उपस्थित होते.

Gold Rate
18 April 2025
Gold 24 KT 95,900 /-
Gold 22 KT 89,200 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना श्री. देबडवार म्हणाले, नागपुरातील सीमेंट रस्ते हे आदर्श उदाहरण आहे. त्यावेळी अनेक अडचणी होत्या. मात्र, पदाधिकारी आणि प्रशासनाची भक्कम साथ असल्यामुळे आलेल्या सर्व अडचणींवर मात करण्यात यश आले. कविवर्य सुरेश भट सभागृह हे नागपूर महानगरपालिकेने केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याचा नमुना आहे. या संस्थेने आपल्याला खूप काही दिले. पदाधिकाऱ्यांनी सामावून घेतले. त्यामुळे सर्वोत्कृष्ट काम देऊ शकलाय, आता शासनाने जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पूर्ण करू. नागपूर महानगरपालिकेने आजपर्यंत खूप काही दिले, त्यामुळे आयुष्यभर या संस्थेच्या ऋणात राहू इच्छितो, असेही ते म्हणाले.

श्रीमती देबडवार यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका म्हणजे आपले दुसरे माहेर असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मुख्य अभियंता म्हणून उल्हास देबडवार यांनी केलेल्या कार्याचा आपल्या शब्दांतून गौरव केला. सकारात्मक विचार काय असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उल्हास देबडवार असल्याचे सांगितले. या व्यक्तीने ठेकेदारांच्या बाबतीतही नेहमी सकारात्मक विचार केला. कुठले कार्य हाती घेतले तर ते पूर्णत्वास कसे न्यायचे हे श्री. देबडवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. सेनापती चांगला असेल तर पूर्ण सेना चांगले कार्य करते, हे देबडवारांनी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना स्थायी समिती सदस्य विजय झलके यांनी उल्हास देबडवार यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अधीक्षक अभियंता मनोज तालेवार म्हणाले, श्री. देबडवार यांच्याकडून माझ्यासह सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना खूप काही शिकायला मिळाले. सीमेंट रस्ता टप्पा दोनच्या कामात त्यांचा अनुभव कामी आला. त्यांचा सहवास म्हणजे परीसस्पर्श ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कॉन्ट्रॅक्टर असोशिएनशचे अध्यक्ष विजय नायडू म्हणाले, त्यांनी या संस्थेला आपले समजले. यातच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. त्यांच्यामुळे आम्हालाही काम करण्यास हुरूप आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. आभार मुख्य अभियंता लिना उपाध्ये यांनी मानले.

Advertisement
Advertisement