आरोग्य तपासणी करून वसतीगृहामध्ये केले दाखल
नागपूर : लहानपणीच आई वडीलांचे छत्र हरपलेले अशात एकमेव आधार असलेला भाउही टीबी ने बाधित. दोघाही बहीण भावाच्या डोक्यावर छत्र नाही, रस्त्याच्या कडेला हातठेल्यावर रात्र काढायची, मिळेल ते खायचे आणि जीवन व्यतीत करायचे. मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये एमडीआरटीबी चे उपचार घेण्यासाठी आलेल्या भावाकडून ही माहिती कळताच सारेच अंचबित राहिले. यावर सर्वांनी सकारात्मक पाउच उचलित ‘त्या’ निराधार मुलीला आधार देत तिला वसतीगृहामध्ये दाखल केले.
उपल्लवाडी मार्गावरील समता नगर परिसरात राहणा-या बहीण भावाची ही करूण कहानी. चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलीला सध्या आशाकिरण बाल वसतीगृह येथे प्रवेश देण्यात आलेला आहे. या भावंडांवरून वडिलांचे छत्र हरविले तेव्हा त्यांना समजही नव्हती तर आईचे २०१८मध्ये टीबी, एचआयव्ही मुळे निधन झाले. अशात भावावर चिमुकल्या बहिणीची जबाबदारी आली. २०१८पासून दोन्ही भावंडं तटपुंज्या कपड्यांसह मिळेल ते खाउन एका हातठेल्यावर झोपून दिवस काढत होते. भाउ एमडीआरटीबी चा रुग्ण असल्याने तो मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आला. त्यावेळी त्याचे समुपदेशन करताना डॉक्टरांपुढे हे वास्तव पुढे आले.
एकूणच परिस्थिती लक्षात घेता डॉ. रोशनी, एसटीएस शिवानंद जायभाये आणि शैलेंद्र मेश्राम यांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधला. त्यांना संपूर्ण परिस्थितीशी अवगत केल्यानंतर मुलीला नवीन कपडे घेउन दिले, तिची कोरोना चाचणी व आरोग्य तपासणी करून मुलीला आशाकिरण वसतीगृहामध्ये दाखल करण्यात आले. या संपूर्ण कार्यामध्ये चाईल्ड लाईनची टिम व सक्षम कार्यक्रम अधिकारी श्री. कोमेश नीलीमा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.