नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी व त्याची माहिती मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी शुक्रवारी (ता.२४) राजे रघुजी भोसले नगर भवन महाल येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, एसएमओ डॉ.एम.साजिद, डॉ.एन.के.राठी, नोडल अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, दरवर्षी भारतात गोवर रूबेला या रोगामुळे सुमारे ४९ हजार रूग्णांचा मृत्यू होतो. नागपुरात मागील वर्षी चार ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. हा रोग देशातून हद्दपार करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मोहीम राबविल्या आहेत. २०२० पर्यंत हा रोग देशातून हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध उपाययोजना सुरू आहेत. महाराष्ट्र शासानाचा आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यासाठी विविध मोहीम हाती घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रारंभी कार्यशाळेचा उद्देश आरोग्य अधिकारी डॉ.अनिल चिव्हाणे यांनी प्रास्ताविकातून सांगितला. कार्यशाळेमध्ये रूबेला लसीकरणाबाबत तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, नोडल अधिकारी डॉ.सुनील धुरडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.