हिंगोली : मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्याचा काही परिसर आज गुढ आवाजानं हादरुन गेला आहे. औंढा नागनाथ तालुक्यात भूगर्भातून गुढ आवाज येत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे यापूर्वी केल्यात. पण हा आवाज नेमका कशाचा आहे याचा उलगडा मात्र अजून झालेला नाही.
औंढा तालुक्यात सौम्य भूकंपासह आवाज
औंढा तालुक्यातल्या पिंपळ दरी गावात आज भूगर्भातून गुढ आवाज आला आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप तरी कोणती अधिकृत महिती देण्यात आली नाही आहे. मात्र, यात मनुष्यहाणी झालेली नाही. गावात गुढ आवाज येत असल्याने गावकरी भयभीत होऊन रस्त्यावर आले होते. प्रशासनही या आवाजानं सतर्क झालं आहे. दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी हा प्रकार झाल्याचं गावकरी सांगतात.
पिंपळ दरी गावात पुन्हा पुन्हा येतोय आवाज
पिंपळदरी गावात भूगर्भातून आवाज येण्याची ही काही पहिली वेळ नाही. आतापर्यंत अनेक वेळेस तरी असा आवाज आल्याची माहिती गावकरी देतात. हा आवाज नेमका कशाचा आहे याचा शोध घेण्यासाठी जवळच्याच स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूगर्भतज्ञ भेट देऊन गेले पण त्यांनाही ठोस असा काही उलगडा झाला नाही. पण या आवाजामुळे फक्त औंढाच नाही तर कळमनुरी, वसमत या तालुक्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
परिसरातल्या गावातही असेच जमीनीखालून आवाज येत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणनं आहे. डिसेंबर महिन्यात तर ४ वेळेस असे आवाज झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. सौम्य यापूर्वी भूकंपाच्या धक्क्यात एका शेतकऱ्याची विहिर कोसळली होती. पण इतर कुठली जीवितहाणी झालेली नव्हती.