नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.सना खानचा पती अमित साहू उर्फ पप्पू याने तिची हत्या करून तिचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली होती. त्यानंतरपासून पोलिसांनी तिचा मृतदेह शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले. काल मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील शिराली तालुक्यातील एका विहिरीत एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. सना खान यांनी अखरेच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखेच कपडे मृतदेहावर आढळून आले. यानंतर सना खान यांच्या कुटुंबियाला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी जबलपूरला बोलाविण्यात आले. मात्रमृतदेह माझ्या बहिणीचा नसल्याचे तिच्या भावाने सांगितले. मग तो मृतदेह नेमका कोणाचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सना खानच्या भावाने सांगितले की, हा मृतदेह माझ्या बहिणीचा नाही-
आठ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका विहिरीत मृतदेह सापडला होता. आठ दिवस उलटूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर हा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, नागपूरच्या भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
हा मृतदेह त्यांचाच असावा, असा संशय नातेवाइकांना आहे. त्यामुळे सना खानचे कुटुंबीय ओळखीसाठी नागपुरातून हरदा येथे पोहोचले. दरम्यान, मृतदेह पाहिल्यानंतर सनाचा भाऊ मोहसीन म्हणाला की, हा मृतदेह त्याच्या बहिणीचा नाही. आता मृतदेहाजवळ सापडलेल्या साहित्याचीही तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान आरोपीने २ ऑगस्टच्या रात्री सनाची हत्या करून मृतदेह नर्मदा नदीत फेकल्याचे सांगितले होते. तेव्हापासून जबलपूर पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. सना खान हत्याप्रकरणात नागपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना १२ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले. तेथून आरोपींना १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे दोन अधिकारी जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. आता पुरावे गोळा करण्यासाठी नागपूरहून फॉरेन्सिक टीम शहरात आली असून, ते आरोपी अमित शाहूचे घर, ढाबा आणि कारची तपासणी करणार आहेत.
२ ऑगस्ट रोजी भाजप नेत्या सना खान जबलपूरमधून बेपत्ता झाल्या होत्या. १२ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी सना खानचा पती अमित साहू उर्फ पप्पू याला अटक केली होती. अमितने पोलिसांना सांगितले होते की, त्याने त्याचा साथीदार राजेश सिंह याच्यासोबत मिळून सना याची काठीने हत्या केली आणि मृतदेह हिरण नदीत फेकून दिला.