नागपूर : भर रस्त्यात जीवंत पेटवून दिलेल्या प्राध्यापक तरुणीची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना दिली. सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. शरीरात जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून तिला देण्यात येणारे अॅन्टिबायोटिकचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.
पीडितेला यूरीन विसर्जनासंदर्भात समस्या निर्माण झाल्या असल्याने डॉक्टरांची विशेष चमू तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. तिच्या शरीरात जंतूसंसर्गाचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे, व्हेटिलेटरद्वारे देण्यात आलेले ऑक्सिजन रक्तात मिसळत नसल्याने प्रकृती खालावत आहे.
अलीकडेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईच्या नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सुनील केशवानी यांच्यासह नागपुरात पीडितेची पाहणी केली होती. राज्य शाससनाने पीडितेच्या उपचारासाठी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मानवतेच्या नात्याने पीडितेच्या उपचारासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.