नागपूर : जुगाराच्या पैशावरून झालेल्या वादात एका कुख्यात गुंडाची गळा कापून हत्या करण्यात आली. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील मायानगर इंदोरा येथे घडली. या घटनेमुळे इंदोरा परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार अवैध धंद्यात सहभागी असलेल्या साथीदारांनीच त्याची हत्या केली. संदीप ऊर्फ काल्या विकास गजभिये (२५) रा. मायानगर इंदोरा, असे मृताचे नाव आहे. काल्याविरुद्ध मारहाण, धमकी देणे, जुगार व मटका चालविण्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊही गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मायानगर परिसरात ललित कला भवन या केंद्राच्या परिसरात त्याने जुगार व मटका अड्डा सुरू केला आहे. या जागेवर तो दिवस-रात्र बसून राहत होता.
मागील काही दिवसांपासून त्याच्या साथीदारासोबत पैशावरून त्याचा वाद सुरू होता. चार दिवसापूर्वीच काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला. यानंतर बुधवारी ३.३० वाजता दरम्यान काल्या आपल्या जुगार अड्ड्यावर आला. त्याचवेळी त्याचा साथीदारासोबत जुन्या पैशावरून वाद झाला. या वादात चौघांनी मिळून काल्याला मारहाण केली. तो पळू लगला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून मैदानातच धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. यानंतर आरोपी फरार झाले.
दुपारी ४.३० वाजता पोलीस कंट्रोल रुमला त्याच्या खुनाची माहिती मिळाली. यानंतर जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविला. या प्रकरणात पोलिसांनी मायानगर येथील शंभू घुबड आणि लंकेश याला ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.