नागपूर : शहरातील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दाम्पत्याच्या मुलींच्या शिक्षणासाठी कारागृह प्रशासनाच्या पुढाकाराने वजह फाऊंडेशन आणि प्रयास टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने पुढाकार घेतला आहे. या पुढाकारामुळे त्या दोन मुलींच्या शैक्षणिक जीवनातील अडथळा दूर होण्यास मदत मिळाली आहे.
एका गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात पती-पत्नी दोघेही शिक्षा भोगत आहेत. त्यांना दोन मुली असून आजी ही सांभाळ करीत होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी आजीचेही निधन झाले. दोन्ही मुलींना शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारागृह अधीक्षक वैभव आगे आणि उपाधीक्षक दीपा आगे यांनी कैद्यांच्या पाल्यांसाठी कल्याणकारी योजना तयार केल्या आहेत.
वजह फाऊंडेशनचे संचालक डॉ. वाळके यांनी कैदी पती-पत्नीच्या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. दोन्ही मुली नववी आणि दहावीत आहेत. त्यांना शहरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली. दोन्ही मुलींना शालेय गणवेश, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. तसेच त्यांना राहण्यासाठी निवास्थानाची व्यवस्था करण्यात आली. कारागृह प्रशासन आणि संस्थेच्या या कृतूमुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.