नागपूर : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. हा निकाल लागण्यापूर्वी विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो. मात्र, या १५ आमदारांवर निकाल येईपर्यंत टांगती तलवार नक्कीच असेल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल असणार आहे. याचे दूरगामी परिणाम भविष्यातील राजकारणावर पडणार आहे. या निकालानंतर घोडेबाजार करू नये, असा मोलाचा सल्ला निकम यांनी राज्यातील राजकीय नेत्यांना दिला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. आज निकाल जाहीर होणार असल्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.