मुंबई: पगार वेळेत न झाल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे वर्तन खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.माहीम येथील पोलीस वसाहतीत जाऊन त्यांच्यावर कारवाईचा आदेश बजाविण्यात आला.
दरम्यान,मुंबई पोलीस दलातील ज्ञानेश्वर अहिरराव यांनी दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याचं सांगत ‘शासकीय गणवेशात भीक मागण्याची’ परवानगी मागितली होती. वेतन न मिळाल्यानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यात आपण अपयशी ठरत आहोत. पोलीस विभागाच्या वरिष्ठ पोलीस आयुक्त दत्ता पडसलगिकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानेश्वर अहिरराव यांनी पत्र लिहिलं आहे.
ज्ञानेश्वर अहिरराव यांची नियुक्ती वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावर सुरक्षा बंदोबस्तावर आहे. कुटुंबात आई, वडील, पत्नी व मुलगी आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी मासिक वेतन वेळेत मिळणे गरजेचे आहे परंतु वेतन वेळेत न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाल्याचे ज्ञानेश्वर अहिरराव यांनी पत्रात लिहिले आहे.या अर्जाच्या प्रती त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलिस आयुक्तांनाही पाठवल्या आहेत.