यवतमाळ : शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटूंबाला भेटावे लागू नये म्हणुन नियोजीत दौरा रद्द करणारे मुख्यमंत्री पळपूटे आहेत. ते काय गरीबांना सोबत घेऊन राज्य चालवणार? शेतक-यांशी त्यांना काही देणेघेणे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. राजुरवाडी येथे चायरे कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता ते बोलत होते.
घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे शंकर चायरे या शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी येऊन आश्वासन देई पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका त्यांच्या कुटूंबियांनी घेतली होती. त्यानंतर आज (ता.१२) रोजी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, विभागीय आयुक्त पियुष सिंग, पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देवानंद पवार यांना पोलीसांनी स्थानबद्ध केले असूनही त्यांना चर्चेसाठी न्यायालयात नेण्यात आले. शासन प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने माजी खासदार नाना पटोले व शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या मध्यस्ती नंतर असंवेदनशिल सरकारपुढे हतबल झालेल्या चायरे कुटूंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली. एक कोटी रूपये आर्थिक मदत व कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी अशी अपेक्षा चायरे कुटूंबियांनी व्यक्त केली होती. महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शासनाच्या वतीने कुटूंबियांशी चर्चा केली. मात्र त्यामधुन कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही.
भारतीय जनता पक्षाचे कोणतेही पदाधिकारी फिरकले नाही. देवानंद पवार यांनी या परिवाराची समजुत काढली. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शविली. शवविच्छेदन करून मृतदेह राजुरवाडी येथे आणण्यात आला. शोकाकुल वातावरणात हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शंकर चायरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार विजया धोटे, मिलिंद धुर्वे, अशोक भुतडा, राजेंद्र हेंडवे, किरण कुमरे, शैलेष इंगोले, शालिकबाबु चवरडोल, सैय्यद रफिक बाबु, गजानन पाथोडे तसेच रोहित सिंग सिद्धु, विनोद मडावी, शंकर येलादी, सुधाकर कोहचाडे, किसन पवार, गोपाल उमरे, संजय डंभारे, रणजीत जाधव, वासूदेव राठोड यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
हा लढा संपला नाही – देवानंद पवार
मृतदेहाचे अवमुल्यन होऊ नये म्हणुन कुटूंबाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हि माघार नसून हा लढा अजुनच तिव्र होणार आहे. एवढ्या संवेदनशिल मुद्द्यावर मुख्यमंत्री निष्ठुर भुमिका घेतात हि सत्तेची गुर्मी आहे. मतदार संघात एवढी दु:खद घटना घडली असतांना भाजपाचे नेते सोहळ्यांमध्ये सहभागी होतात. शेतकरी कुटूंबाला भेटण्यास त्यांना वेळ मिळत नाही हि अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मृत शेतक-याच्या कुटूंबाला भेटण्याचा दबाव येईल या भीतीने मुख्यमंत्री नियोजीत यवतमाळ दौरा रद्द करतात. मात्र उमरखेड येथिल कार्यक्रमाला उपस्थित राहतात हि एकुणच अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजप सरकारला याचे उत्तर जनता येत्या निवडणुकीत देईल असे यावेळी बोलतांना शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एवढे पळपूटे असतील असे वाटले नव्हते – जयश्री चायरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका शेतकरी परिवाराला भेटावे लागू नये म्हणुन यवतमाळ दौरा रद्द करून पळून जातात. त्यांना गरीब शेतक-यांच्या समस्यांची जाणिव व्हावी म्हणुन त्यांनी घरी येऊन आमचे दु:ख ऐकावे अशी आमची माफक अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री पळपूटे निघाले अशी भावना मृत शेतकरी शंकर चायरे यांची मुलगी जयश्री हिने व्यक्त केली. गरिबाच्या दु:खाला पाहुन पळ काढणा-या मुख्यमंत्र्यांकडून आणखी काय अपेक्षा करावी असे ती म्हणाली.