नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात ॲपल कंपनीच्या नावाने नकली एयरपॉड्सच्या विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी कारवाई करत विक्रेत्याला बेडया ठोकल्या आहेत, अशी माहिती सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण डोळस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
इंस्टाग्रामवर नागपुरात ॲपलच्या एयरपॉडची अर्ध्या किमतींमध्ये विक्री करण्यात येत असल्याची एक जाहिरात प्रकशित झाली होती. त्यानंतर शहरातील अनेकांची या एयरपॉडच्या खरेदीसाठी रेलचेल सुरु झाली. मात्र हे एयरपॉड नकली असल्याचे काळात एका ग्राहकाने यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गिट्टीखदान येथील सुरेंद्र गढ परिसरातील मोबाईल शॉपीवर धाड टाकली. यादरम्यान दुकानदार कृष्णा पिल्लारे नावाच्या व्यक्तीकडून ॲपलच्या नकली एयरपॉडची विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. आरोपी विक्रेता हा मुंबईवरून बनावटी एयरपॉड्स मागवून त्याची कमी दारात विक्री करीत होता.
गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून दुकानावर छापा टाकून 10 लाख रुपये किमतीचे बनावट एयरपॉड जप्त केले असून पोलसांनी पुढील तपास सुरु केला आहे.