वाशीम : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात महिला तस्करीचे प्रमाण सर्वाधिक होत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. महिला बेपत्ता होण्याच्या १३ लाख तक्रारी आहेत. यातील ७ लाख महिला घरी परतल्या आहेत. पाच लाख महिला अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्य महिला आयोग ‘आपल्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत चाकणकर वाशीम येथे आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आतापर्यंत महिला आयोगाने ३१ जिल्ह्यातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यातच नव्हे देशात महिला तस्करीचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री भ्रूण हत्या आजही होत आहेत. राज्यात बाल विवाहाचे प्रमाण अधिक आहे.
पण तक्रारी होत नाहीत. त्यासाठी विशेष कायदा करण्याचे प्रयोजन आहे. राज्यातील अनेक ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र ते तसेच धूळखात पडले असल्याचे चाकणकर म्हणाल्या.
आम्ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, निवासी उप जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.