कामठी :-‘जल ही जीवन है’याचे महत्व पटवून सांगण्यासाठी आज शनिवारी कामठी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा झाल्या यानुसार महिन्याचा चौथा शनिवार असूनही खैरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली.या विशेष ग्रामसभेत पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त ग्रामपंचायत सरपंचांना पाठविलेले जनजागृतीपर पत्राचे वाचन सुद्धा करण्यात आले.
कामठी तालुक्यातील नागरिकांना यंदा भीषण पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले याला महत्वपूर्ण जवाबदारी असलेले रेनवाटर हार्वेस्टिंग कडे असलेले अक्षम्य दुर्लक्ष होय तसेच भूगर्भातील झपाट्याने खाली जाणारी पाण्याची पातळी होय.भविष्यात पानी समस्येवर मात करण्यासाठी पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संगोपन होणे गरजेचे आहे.
शिवाय पावसाचे पाणी गाव, शेत, शिवारात कसे मुरवता येईल यासाठी विशेष प्रयत्न होणे अति गरजेचे आहे.या अनुषंगाने शेतकऱयांनी शेतांची बांधबंदिस्ती तर स्थानिक प्रशासनाने नदी व ओढ्यात चेक डयाम तयार करणे, तसेच तटबंदी करणे, तलाव खोलीकरण व सफाई करणे,वृक्षारोपण आणि पावसाचे पाणी संचयित करण्यासाठी टाळी, तळे आदी कामे हाती घेतली पाहिजे, ही कामे हाती घेतल्यास पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यास किंवा त्यांचे संगोपन करण्यासाठी मदत होत भविष्यातील जलसंकटावर मात करता येणार आहे याबाबत विशेष चर्चा करण्यात आली तसेच पावसाच्या पाण्याचे संगोपन करण्यासाठी एक मोठी लोकचळवळ उभी व्हावी या उद्देशाने ग्रामसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त सरपंचाना पाठविलेल्या जलनियोजन पत्राचे वाचन करण्यात आले. तद्नंतर गावात पावसाळ्यात वाहणाऱ्या सांडपाणी तसेच स्वच्छतेबद्दल जनजागृती करीत जलसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले.याप्रसंगी खैरी गावातील सरपंच बंडू कापसे, उपसरपंच, ग्रा प सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका , आरोग्य सेविका तसेच गावातील स्थानिक संस्था सदस्य व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी