नागपूर : शहरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात बिबट्या शिरल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असून येथील रहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तसेच बिबट्याने परिसरतील एक व्यक्तीला उचलून नेल्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्या हा गोरेवाड्यातून या परिसरात शिरल्याची माहिती समोर येत आहे.दाभा येथील रहिवासी क्षेत्रात बिबट्या शिरल्याची माहिती पोलिस विभागाला कळताच त्यांनी वन विभागाच्या याची माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे दाभा भागात अनेकदा रहिवाशांना बिबट्या दिसला आहे. बिबट्याने काही भटक्या कुत्र्यांनाही ठार केल्याचे समोर आले.
या घटनेसंदर्भात नागपूर टुडेने गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधला. त्यांनी बिबट्याने परिसरातील एका व्यक्तीला उचलून नेल्याचे वृत्त फेटाळले आहे.
दरम्यान शहरात पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी वाडी, अंबाझरी, आयटी पार्क, महाराजबाग परिसर आणि एवढेच नव्हे तर शहराच्या आत तब्बल आठ दिवस बिबट्याने मुक्काम ठोकला होता. तर आता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाजवळील निवासी भागात १६ मे रोजी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते.